
प्रदूषण घालवणारी टॉप टेन झाडे
(दुर्गा मोघे) नासाच्या प्रयोगानुसार घरातल्या प्रदूषणावर मात करणाऱ्या झाडांच्या प्रयोगाची आपण माहिती पाहिली. ही झाडे कोणती ते जाणून घेण्याची आपली उत्सुकता असेल. महत्त्वाचे म्हणजे काही अपवाद वगळता ही झाडे आपल्या परिचयाची व सहज उपलब्ध होणारी आहेत. ........घरातल्या रंग, वॉर्निश इ बेन्झीन तर पार्टिकल बोर्ड, विविध स्वच्छके यांच्यामध्ये फॉर्मल्डेहाइडचा वापर केलेला असतो. याशिवाय चिकटवण्याची रसायने (ऍडेझिव्हस), रंग वॉर्निश यांमध्ये ट्रायक्लोरोइथीलीन या प्रदूषक रसायनांचा वापर केलेला असतो. हे प्रदूषण कसे कमी करता येईल याचा विचार करताना नासाने विविध सहज उपलब्ध होणाऱ्या शोभेच्या झाडांची निवड करून प्रयोग केले. त्यात जी १० मुख्य झाडे समोर आली ती आपल्यालाही सहज उपलब्ध होऊ शकतात. बांबू पाम/ शॅमेडोरीया पाम हा अनेक ठिकाणी पाहायला मिळणारा, कुंडीत किंवा जमिनीत सहजपणे येणारा पाम पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ अगदी नेहमीचे झालेले चंदेरी हिरव्या रंगसंगतीचे ऍगलोनीमाचे झाड आहे. इंग्लिश आयव्ही हे तिसऱ्या क्रमांकाचे झाड आपल्याकडे फारसे नसते, मात्र त्यानंतरचे जर्बेराचे झाड व त्याची फुले आता सर्वांच्या परिचयाची आहेत. ड्रसीनाच्या रंगीबेरंगी ३ प्रकारांच्या वनस्पतींचा क्रमांक अनुक्रमे पाच, सहा व सातवा आहे. त्यात जेनेट क्रेग, लालसर लांबट पानांची मार्जिनाटा व मक्यासारख्या पानांची कॉर्न प्लांट यांची वर्णी लागते. घणसपपात या सापाच्या पाठीसारख्या दिसणाऱ्या वनस्पतीला आठवे स्थान, तर शेवंतीला नववे व नागफणी अथवा स्पॅथीफायलम याला दहावे स्थान मिळाले आहे. यातली शेवंती व जर्बेरा ही फूलझाडे सोडली, तर बाकीची सर्व सावलीतही उत्तम वाढतात. त्यामुळे यातली अनेक झाडे (व त्यांचे भाइबंदही-त्या कुळातली अन्य झाडे) मुद्दाम प्रदूषण नियंत्रणासाठी लावता येतील. टॉप टेन झाडांव्यतिरिक्त अन्य झाडेही प्रदूषण दूर करण्यास मदत करतातच. कारण नासाच्या प्रयोगातल्या काही मर्यादा लक्षात घेतल्या, तर एक उदाहरण म्हणून या वनस्पतींकडे पाहणे इष्ट ठरेल. तुळस, औदुंबर, कडुलिंब यांसारख्या झाडांचा त्यांच्या अभ्यासात समावेश नसल्याने अशा अनेक देशी वनस्पतीही त्यातून सुटल्या असतील. त्यामुळे "टॉप टेन'च्या यादीतली झाडे तुमच्याकडे असतील तरी उत्तम, मिळत असली तरीही उत्तम; पण अजिबात नसतीलच तर खट्टू होण्याचे कारण नाही. पण या निमित्ताने काही नवी झाडे लावण्याचे आपल्या मनात आले, तरी या लिखाणाचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल!